स्थूलता आणि क्षयरोग : बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणारे नवे आरोग्य आव्हान. जागतिक स्थूलता दिन – ४ मार्च २०२६ (World Obesity Day) डॉ. राजेंद्र तातू ननावरे श्वसन विकार तज्ज्ञ (Pulmonologist) व छाती रोग तज्ञ.
Published On: March 4, 2026
जागतिक स्थूलता दिन – ४ मार्च २०२६ (World Obesity Day)
स्थूलता आणि क्षयरोग : बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणारे नवे आरोग्य आव्हान
४ मार्च हा दिवस जगभर जागतिक स्थूलता दिन (World Obesity Day) म्हणून साजरा केला जातो. बदलती जीवनशैली, असंतुलित आहार, शारीरिक हालचालींचा अभाव आणि वाढता ताण यामुळे आज स्थूलता (Obesity) ही जगभरातील एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे.
डॉ. राजेंद्र तातू ननावरे, श्वसन विकार तज्ज्ञ व क्षयरोग तज्ञ (मुंबई) यांच्या मते, पूर्वी क्षयरोग (TB) हा प्रामुख्याने कुपोषित किंवा वजनाने कमी असलेल्या रुग्णांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येत होता. मात्र सध्या बदललेल्या जीवनशैलीमुळे स्थूल किंवा जास्त वजन असलेल्या रुग्णांमध्येही क्षयरोगाचे प्रमाण वाढताना दिसत आहे, ही चिंताजनक बाब आहे.
स्थूलता ही केवळ शरीराच्या बाह्य स्वरूपाशी संबंधित समस्या नसून ती मधुमेह, उच्च रक्तदाब, फॅटी लिव्हर, हृदयरोग आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे यांसारख्या अनेक आजारांना कारणीभूत ठरते. त्यामुळे शरीराची संसर्गाशी लढण्याची क्षमता कमी होऊ शकते आणि क्षयरोगासारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो.
स्थूल रुग्णांना क्षयरोग झाल्यास उपचार करताना काही वैद्यकीय आव्हाने निर्माण होतात. क्षयरोगावरील औषधांचा डोस हा अनेकदा रुग्णाच्या वजनावर अवलंबून असतो. त्यामुळे जास्त वजन असलेल्या रुग्णांमध्ये औषधांचा डोस जास्त लागण्याची शक्यता असते, ज्यामुळे औषधांचे दुष्परिणाम, विशेषतः यकृतावर होणारा परिणाम (Drug-Induced Hepatitis) यांचा धोका वाढू शकतो. म्हणून अशा रुग्णांमध्ये उपचार करताना तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली काळजीपूर्वक उपचार करणे आवश्यक असते.
डॉ. ननावरे यांच्या मते, स्थूलता ही जीवनशैलीशी संबंधित दीर्घकालीन अवस्था (Lifestyle Disease) असून तिचे नियंत्रण करण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण, पुरेशी झोप आणि ताण नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे आहे.
आजच्या काळात संतुलित आहार घेणे, नियमित चालणे किंवा व्यायाम, फास्ट फूड व जंक फूडचे सेवन कमी करणे, तसेच नियमित आरोग्य तपासणी या उपाययोजना करून स्थूलतेपासून बचाव करता येऊ शकतो.
जागतिक स्थूलता दिनाच्या निमित्ताने समाजाने आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे आणि स्थूलतेविरुद्ध जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे. स्थूलतेवर नियंत्रण ठेवणे हे केवळ दीर्घकालीन आजार टाळण्यासाठीच नव्हे तर संसर्गजन्य आजारांपासूनही शरीराचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचे आहे.
“सुदृढ जीवनशैली हीच योग्य औषध आहे.”
डॉ. राजेंद्र तातू ननावरे
श्वसन विकार तज्ज्ञ (Pulmonologist) व छाती रोग तज्ञ
MBBS, TDD, DETRD, AFIH, FCCP, PGDHA, DPH
Fellowship in Pulmonology
Advanced Certificate Course in Pulmonology
मुंबई
—